सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९

ज्ञानेश्वरीतील अमृत वेचे ...६_२

                फलासक्तीविण कर्म
गीता (अ. २)  :
   कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
   मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥४७॥
अर्थ  :  कर्म करणे हाच तुझा अधिकार आहे. फलाच्या ठिकाणी अधिकार दाखवू नकोस. तू कर्मफलाचे निमित्त कधी होऊ नयेस आणि अकर्माचे ठिकाणी तुझी आसक्ती नसावी.
   ज्ञानेश्वरी (अ.२) :
       म्हणोनि आइकें पार्था । याचिपरी पाहतां ।
तुज उचित होय आतां । स्वकर्म हें ॥२६५॥
       परी कर्मफळीं आस न करावी । आणि संगती न व्हावी । हे सत्क्रियाचि आचरावी । हेतूविण ॥२६६॥
    अर्थ : म्हणून अर्जुना, मी काय सांगतो ते ऐक. याप्रमाणे विचार केल्यास तुला युद्ध  (स्वधर्म असल्यामुळे) करणेच योग्य आहे.
    परंतु कर्म करीत असताना कर्मापासून मला इच्छित फळ प्राप्त झाले पाहिजे असे मात्र मनात धरू नये आणि कर्माचा त्यागही करू नये. ही स्वधर्मरूपी सत्क्रियाच हेतूशिवाय आचरणे योग्य आहे.
(श्रीज्ञानेश्वरी गुढार्थदीपिका, खंड १ला
  :  वेदान्तकेसरी बाबाजी महाराज पंडीत, वरून)

शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१९

ज्ञानेश्वरीतील अमृत वेचे ...५_२



                   अविनाशी आत्मा 

   गीतेचा श्लोक  :

           
            वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि । तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥२२-२॥

            नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ॥२३॥

             अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च । नित्य: सर्वगत: स्थाणुरचलोऽयं सनातन: ॥२४॥

       ज्ञानेश्वरीतील ओवी :


             जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे । तैसें देहांतरातें स्वीकारिजे । चैतन्यनाथें ॥४४॥

              हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु । म्हणऊनि शस्त्रादिकीं छेदु । न घडे यया ॥४५॥

        अर्थ  : 

                ज्याप्रमाणे पुरूष जीर्ण वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी घेतो, त्याप्रमाणे आत्मा जीर्ण शरीरे टाकून देऊन दुसरी नवी प्राप्त करून घेतो.
                आत्म्याला शस्त्रे तोडू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकऊ शकत नाही. या आत्माचा छेद होणे, दाह होणे, तो आर्द्र होणे किंवा शुष्क होणेही अशक्यच आहे. हा नित्य, सर्वव्यापी, स्थिर, अचल, सनातन आहे.
                ( हा अविनाशी असल्यामुळे तुला आप्तेंष्टाच्या मृत्यूभयाने शोक करणे उचित नाही. )



              ( श्री. दांडेकर महाराज संपादित वरून )


               




गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९

ज्ञानेश्वरीतील अमृत वेचे ...४_२


                चैतन्य आणि प्रपंच 



    आतां अर्जुना आणिक कांहीं एक । सांगेन मी आईक । जें विचारें  परलोक । वोळखिती ॥१२५॥
    या उपाधिमाजीं गुप्त । चैतन्य असे सर्वात । तें तत्वज्ञ संत । स्विकारिती ॥१२६॥
     सलिलीं पय जैसें । एक होऊनि मीनलें असे । परी निवडूनि राजहंसें । वेगळें कीजे ॥१२७॥
      कीं अग्निमुखें किडाळ । तोडोनियां चोखाळ । निवडिती केवळ । बुद्धिमंत ॥१२८॥
       ना तरी जाणिवेचिया आयणी । करितां दधिकडसणी । मग नवनीत निर्वाणीं । दिसे जैसें ॥१२९॥
        कीं भूस बीज एकवट । उपणितां राहे घनवट । तेथ उडे तें फलकट । जाणों आलें ॥१३०॥
        तसैं विचारितां निरसलें । तें प्रपंचु सहजें सांडवलें । मग तत्वता तत्व उरलें । ज्ञानियांसी
॥१३१॥
        म्हणोनि अनित्याचां ठायीं । तया आस्तिक्यबुद्धि नाही । निष्कर्ष दोहींही । देखिला असे ॥१३२॥


अर्थ : 

           आता अर्जुना, तुला मी आणखी एक गोष्ट सांगतो, ऐक. ज्ञानी पुरूष वस्तुस्वरूप विचाराने जाणतात. या देहात , जगात सर्वत्र चैतन्य गुप्त रूपाने आहे, हे तत्व जाणणारे संत त्याचा स्वीकार  करतात.
           दुध पाण्यात एकरूप होऊन मिसळून गेले असते. राजहंस निवडून ते वेगळे करतो ; किंवा हुशार लोक अग्नीच्या सहाय्याने हिणकस धातू वेगळा करून केवळ शुद्ध सोने निवडतात. किंवा दही घुसळले असता लोणी वेगळे दिसते. किंवा एकत्र असलेले भूस आणि धान्य उफणले असता धान्य राहते आणि फोलकट उडून जाते, असे जाणवते.
            तसा विचार केला असता, प्रपंच मिथ्या आहे, असे ज्ञानी पुरूषांना जाणवते; ते प्रपंच सोडतात. त्यांच्या ठिकाणी एकच तत्व चैतन्य  उरते. देह, प्रपंच अशाश्वत आहेत आणि चैतन्य नित्य आहे, असा निष्कर्ष निघतो.
            


 (सार्थ ज्ञानेश्वरी, श्री. दांडेकर महाराज संपादित, वरून)