बुधवार, ३१ जुलै, २०१९

ज्ञानेश्वरीतील अमृत वेचे ...३_२

 

                    अंधकारें भानु 


  हें पाहतां तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें। ऐसें पौरूष चोखडें । पार्था तुझें ॥१०॥

तो तूं कीं आजि येथें । सांडुनिया वीरवृत्तीतें । अधोमुख रूदनातें । करितू आहासी ॥११॥

विचारीं तूं अर्जुनु । कीं कारूण्यें कीजसी दीनु । सांग पां अंधकारें भानु । ग्रासिला आथी ॥१२॥

ना तरी पवनु मेघासी बिहे । कीं अमृतासी मरण आहे । पाहें पां इंधनचि गिळोनि जाये । पावकातें ॥१३॥

 कीं लवणोंचि जळ विरे । संसर्गे काळकुट मरे । सांग महाफणी दुर्दरें । गिळिजे कायी ॥१४॥

 सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथि कां जाहला । परि तो त्वां साच केला । आजि एथ ॥१५॥

       अर्थ : (कृष्ण  अर्जुनाला म्हणाला -)

           तुझ्या तुलनेने त्रैलोक्य सुध्दा छोटे वाटते. तोच तू आज इथे वीरवृत्ती सोडून, खाली मान घालून रडत आहेस. विचार कर, अर्जुना, करूणेमुळे  तू दीन झाला आहेस. सांग बरे, अंधकार कधी सुर्याला ग्रासेल काय ? कधी वारा मेघाला भितो कां ? किंवा अमृताला मरण आहे काय ? अरे पहा, लाकुडच अग्नीला गिळून टाकील काय? किंवा मिठाने पाणी विरेल कां ? संसर्गाने कालकुट  (समुद्र मंथनातुन निघालेले विष) मरेल काय?सांग, बेडूक महासर्पाला गिळेल काय? कोल्हा सिंहासी भिडेल काय? असे अघटित कधी घडले आहे काय? पण आज इथे तू खरे केले.
(तू खंबीर होवून धनुष्यबाण हाती घे.)

   
                     (श्री. दांडेकर महाराज संपादित वरून)

ज्ञानेश्वरीतील अमृत वेचे ...२_१



                      कुळहरणीं पातकें 


जरी वधु करूनि गोत्रजांचा । तरी वसौटा होऊनि दोषांचा । मज जोडलासि तूं हातींचा । दूरी होसी ॥२२८॥

कुळहरणीं पातकें । तियें आंगीं जडती अशेखें । तयें वेळी तूं कवणें कें । देखावासी ॥२२९॥

जैसा उद्यानामाजीं अनळु । संचरला देखोनि प्रबळु । मग क्षणभरी कोकिळु । स्थिर नोहे ॥२३०॥

सकर्दम सरोवरू । अवलोकुनि चकोरू । न सेवितु अव्हेरू । करूनि निघे ॥२३१॥

तयापरी तूं देवा । मज झकों न येसी मावा । जरी पुण्याचा बोलावा । नाशिजैल ॥२३२॥

अर्थ : (अर्जुन म्हणाला कृष्णाला -)

          जर मी नातलगांचा वध केला, तर सर्व दोष मला लागतील आणि तुझी सोबत हातची जाईल. कुळाच्या घाताने मला पातकें लागतील,  तेव्हा मी तुला कुठे पाहावे ?
            ज्याप्रमाणे बगीच्याला भयंकर आग लागलेली पाहून कोकिळ तिथे क्षणभरही थांबत नाही; चिखलाने भरलेले सरोवर पाहून चकोर त्याचा त्याग करून निघुन जातो; त्याप्रमाणे हे देवा, जर माझे पुण्य संपले तर तू माझ्याकडे येणार नाहीस.


                     (श्री. दांडेकर महाराज संपादित वरून)

ज्ञानेश्वरीतील अमृत वेचे ...१_१

     

                  शब्देविण संवादु


जैसे शारदियेचे चंद्रकळे । माजीं अमृतकण कोंवळे । ते वेंचिती मनें मवाळें । चकोरतलगें॥५५॥

तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा । अति हळुवारपण चित्ता । आणूनियां ॥५६॥

हे शब्देविण संवादिजे । इंद्रियां नेणतां भोगिजे । बोलाआदि झोंबिजे । प्रमेयासी ॥५७॥

जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळें नेणती । तैसी परी आहे सेविती । ग्रंथीं इये ॥५८॥

कां आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंद्रु प्रगटतां । हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ॥५९॥

ऐसोनि गंभिरपणें । स्थिरावलेनि अंत:करणें । आथिला तोची जाणे । मानूं इये ॥६०॥

अर्थ :  ज्याप्रमाणे शरदॠतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोरांची पिलें मृदू मनाने वेचतात, त्याप्रमाणे चित्त अगदी हळुवार करून, मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी. ह्यात दिलेल्या सिद्धांतांचे आकलन होण्यासाठी, इंद्रियांना न कळत, शब्दावाचून मनातच मनन करावे.

     जसे भुंगे कमळातील पराग नेतात आणि पाकळ्याना कळतही नाही, तसे या ग्रंथाचे ग्रहण करावे. किंवा चंद्र दिसू लागताच कुमुदिनी उमलते आणि आपल्या जागेवरूनच त्याला आलिंगन देते, हे प्रेम तिलाच जाणे.
     त्याचप्रमाणे गंभीर आणि स्थिर अंतकरण असलेलाच गीतेचे रहस्य जाणतो.



                       (श्री. दांडेकर महाराज संपादित वरून)

सावता माळी

           

                     सावत्याचा मळा 

         
              आमुची माळीयाची जात ।
                   शेत लावूं बागाईत  ॥१॥
             आम्हां हाती मोट नाडा ।
                  पाणी जाते फुलझाडा ॥२॥
              शांती शेवंती फुलली ।
                   प्रेम जाई जुई व्याली ॥३॥
              सांवत्याने केला मळा ।
                   विठ्ठल देखियला डोळा ॥४॥


              I am a gardener.
              I prepare a garden in the                            field.   (1)

              I water flower-plants & water                    flows into them.  (2)

              Various flowers like Shanti,                        Shevanti, Jai, Jui blossomed                        with affection.  (3)

               I (Saint Savata mali) prepared                   the garden
               &
               I saw God  ( Vithhal deity )                         there with  my own eyes.  (4)