अंधकारें भानु
हें पाहतां तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें। ऐसें पौरूष चोखडें । पार्था तुझें ॥१०॥
तो तूं कीं आजि येथें । सांडुनिया वीरवृत्तीतें । अधोमुख रूदनातें । करितू आहासी ॥११॥
विचारीं तूं अर्जुनु । कीं कारूण्यें कीजसी दीनु । सांग पां अंधकारें भानु । ग्रासिला आथी ॥१२॥
ना तरी पवनु मेघासी बिहे । कीं अमृतासी मरण आहे । पाहें पां इंधनचि गिळोनि जाये । पावकातें ॥१३॥
कीं लवणोंचि जळ विरे । संसर्गे काळकुट मरे । सांग महाफणी दुर्दरें । गिळिजे कायी ॥१४॥
सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथि कां जाहला । परि तो त्वां साच केला । आजि एथ ॥१५॥
अर्थ : (कृष्ण अर्जुनाला म्हणाला -)
तुझ्या तुलनेने त्रैलोक्य सुध्दा छोटे वाटते. तोच तू आज इथे वीरवृत्ती सोडून, खाली मान घालून रडत आहेस. विचार कर, अर्जुना, करूणेमुळे तू दीन झाला आहेस. सांग बरे, अंधकार कधी सुर्याला ग्रासेल काय ? कधी वारा मेघाला भितो कां ? किंवा अमृताला मरण आहे काय ? अरे पहा, लाकुडच अग्नीला गिळून टाकील काय? किंवा मिठाने पाणी विरेल कां ? संसर्गाने कालकुट (समुद्र मंथनातुन निघालेले विष) मरेल काय?सांग, बेडूक महासर्पाला गिळेल काय? कोल्हा सिंहासी भिडेल काय? असे अघटित कधी घडले आहे काय? पण आज इथे तू खरे केले.(तू खंबीर होवून धनुष्यबाण हाती घे.)
(श्री. दांडेकर महाराज संपादित वरून)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा