कुळहरणीं पातकें
जरी वधु करूनि गोत्रजांचा । तरी वसौटा होऊनि दोषांचा । मज जोडलासि तूं हातींचा । दूरी होसी ॥२२८॥
कुळहरणीं पातकें । तियें आंगीं जडती अशेखें । तयें वेळी तूं कवणें कें । देखावासी ॥२२९॥
जैसा उद्यानामाजीं अनळु । संचरला देखोनि प्रबळु । मग क्षणभरी कोकिळु । स्थिर नोहे ॥२३०॥
सकर्दम सरोवरू । अवलोकुनि चकोरू । न सेवितु अव्हेरू । करूनि निघे ॥२३१॥
तयापरी तूं देवा । मज झकों न येसी मावा । जरी पुण्याचा बोलावा । नाशिजैल ॥२३२॥
अर्थ : (अर्जुन म्हणाला कृष्णाला -)
जर मी नातलगांचा वध केला, तर सर्व दोष मला लागतील आणि तुझी सोबत हातची जाईल. कुळाच्या घाताने मला पातकें लागतील, तेव्हा मी तुला कुठे पाहावे ?ज्याप्रमाणे बगीच्याला भयंकर आग लागलेली पाहून कोकिळ तिथे क्षणभरही थांबत नाही; चिखलाने भरलेले सरोवर पाहून चकोर त्याचा त्याग करून निघुन जातो; त्याप्रमाणे हे देवा, जर माझे पुण्य संपले तर तू माझ्याकडे येणार नाहीस.
(श्री. दांडेकर महाराज संपादित वरून)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा