शब्देविण संवादु
जैसे शारदियेचे चंद्रकळे । माजीं अमृतकण कोंवळे । ते वेंचिती मनें मवाळें । चकोरतलगें॥५५॥
तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा । अति हळुवारपण चित्ता । आणूनियां ॥५६॥
हे शब्देविण संवादिजे । इंद्रियां नेणतां भोगिजे । बोलाआदि झोंबिजे । प्रमेयासी ॥५७॥
जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळें नेणती । तैसी परी आहे सेविती । ग्रंथीं इये ॥५८॥
कां आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंद्रु प्रगटतां । हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ॥५९॥
ऐसोनि गंभिरपणें । स्थिरावलेनि अंत:करणें । आथिला तोची जाणे । मानूं इये ॥६०॥
अर्थ : ज्याप्रमाणे शरदॠतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोरांची पिलें मृदू मनाने वेचतात, त्याप्रमाणे चित्त अगदी हळुवार करून, मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी. ह्यात दिलेल्या सिद्धांतांचे आकलन होण्यासाठी, इंद्रियांना न कळत, शब्दावाचून मनातच मनन करावे.
जसे भुंगे कमळातील पराग नेतात आणि पाकळ्याना कळतही नाही, तसे या ग्रंथाचे ग्रहण करावे. किंवा चंद्र दिसू लागताच कुमुदिनी उमलते आणि आपल्या जागेवरूनच त्याला आलिंगन देते, हे प्रेम तिलाच जाणे.त्याचप्रमाणे गंभीर आणि स्थिर अंतकरण असलेलाच गीतेचे रहस्य जाणतो.
(श्री. दांडेकर महाराज संपादित वरून)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा